Wednesday, April 6, 2016

प्रवाहातल्या माणसांच्या कथांची गोधडी!1.
शिशिरर्तुच्या पुनरागमें एकेक पान गळावया...
बा.सी. मर्ढेकरांची ही ओळ आठवण्याचं कारण होतं, अवधूत डोंगरे लिखित पान, पाणी नि प्रवाह या कादंबरीच्या सुरुवातीचा उपोद्घात. अर्थात मर्ढेकरांची भावुक वृत्ती कादंबरीच्या या उपोद्घातात नाही, तसंच कादंबरीतही नाही. उलट त्यात एक तटस्थता व अलिप्तपणा आहे, नेमकी आणि मिनिमिलिस्टिक वर्णनं आहेत. आणि त्याहीपुढे ही कादंबरी माणसांच्या बारक्या बारक्या गोष्टींतून प्रवाहातल्या एकेका माणसाची कथा सांगू पाहते. तर ही कविता स्वत:पाशीच थांबून राहते. तर मर्ढेकरांच्या ओळी बाजूला ठेवू आणि अवधूतच्या कादंबरीकडे वळू या.
त्याआधी अवधूतने आधी लिहिलेल्या कादंबर्‍यांचा उल्लेख करायला हवा. त्या अशा – स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट आणि एका लेखकाचे तीन संदर्भ. आधीच्या या कादंबर्‍यांचे उल्लेख करण्याचं कारण असं की, या दोन्ही – विशेषकरून एका लेखकाचे तीन संदर्भ या कादंबरीचं एक्स्टेशन वाटावं अशी पान, पाणी नि प्रवाह ही कादंबरी वाटते. एका लेखकाचे..मध्ये अवधूतने तीन गोष्टी रचून त्यातून आजूबाजूचं वास्तवाचा वेध घेता घेताच लेखकाच्या सर्जनशील प्रक्रियेचा शोध घेण्याचा किंवा त्याच्या रचिताची प्रक्रिया उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पान, पाणी...मध्येही त्याने हाच प्रयत्न केला आहे, फक्त या वेळी त्याने त्यात नक्षलवादी चळवळीतली प्रत्यक्ष सहभागी माणसं म्हणजे कार्यकर्ते आणि त्यांच्या आजूबाजूची, या चळवळीशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेली माणसं यांच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि त्याच वेळी कादंबरीलेखनाच्या प्रक्रियेवरही चिंतन केलेलं आहे. त्यामुळे हा एक वेगळा प्रयोग आहे. हा प्रयोग आधुनिकोत्तर गंमत आहे. कारण यात जशी माणसं बोलतात, लेखक-निवेदक बोलतो, तसंच पानही बोलतं, एक बगळाही बोलतो. मध्येच एखादा खड्डा ज्यात सायली नावाच्या पात्राची एक वही असते, त्या वहीतली टिपणं जाणून घेण्यासाठी तो आपल्याला ती वही खुली करून देतो. अशा गमती करून अवधूतने कादंबरीत अद्भुतताही आणली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
कादंबरीचा फॉर्म अवधूतने एवढा लवचीक केला आहे की, त्यात मुलाखती, फेसबुकवरची टिपणं, डायरीतल्या नोंदी, सिनेमांच्या गोष्टी, इतिहास, फोटो, आकृत्या अशा सगळ्या गोष्टींची मिसळ तयार केली आहे. कादंबरीच्या निवेदनाचा टोन अलंकारिक नसून, तो रिपोर्ताजी, थेट व सरळ आहे, अलिप्त आहे. आणि कुठे कुठे तो उपाहात्मक होतो. हा उपहास बोचरा आणि अंतर्मुख करणारा आहे. कादंबरीला अनुक्रम नाही. तर फांद्याआहेत, आणि अशा 15 फांद्यांनी मिळून हे एक कादंबरीचं झाड तयार झालं आहे.
2.
सर्वसाधारणपणे प्रकाशित होणार्‍या नेहमीच्या मराठी कादंबर्‍या वाचण्याची सवय मोडून अवधूतची ही कादंबरी हातात घ्यावी लागते, हे प्रथमताच सांगायला हवे. कारण सुरुवातीपासून काय चाल्लंय, निवेदक असं काय बोलतोय वगैरे प्रश्न पडू शकतात. कारण कादंबरी वाचनीय असली, तरी तिला जे काही म्हणायचं आहे, ते सोप्या-ढोबळ पद्धतीने वाचकाच्या हातात काहीही ठेवत नाही किंवा अधिक थोड्या उपाहासात्मक शब्दांत बोलायचं तर ती कोणतंही सामाजिक वास्तव चितारत, बंडखोरी करत नाही की चमच्याने उपदेशही पाजत नाही.
अर्थात कादंबरीत सामाजिक वास्तवाचे तपशील जरूर येतात, उलट कादंबरीतला महत्त्वाच्या भागांपैकी एक भाग हा नक्षलवादी चळवळीचा – जी सामाजिक उत्थानाची उघड भूमिका घेते – असा आहे. तरी ही कादंबरी तिला जे काही मांडायचं आहे त्यासाठी काही व्यूह रचते. त्यामुळे हे व्यूह सोडवण्यासाठी कादंबरी किंवा फिक्शन हे लेखकाने निर्माण केलेलं, रचलेलं एक स्वतंत्र असं जग असतं, ही जाणीव ध्यानीमनी खोल रुजवण्याची आवश्यकता आहे. अवधूतने रचलेले हे व्यूह आपोआप, सावकाशरीत्या सुटे होत जातात. पण तरी शेवटाला ते आपल्या हातात ठोस असं काहीही ठेवत नाहीत. उलट ते वाचकाकडून वेगवेगळ्या इंटरप्रिटेशन्स मागणी करतात, त्याला तसा विचार करायला उद्युक्त करतात.
विषय या प्रकरणात निवेदक म्हणतो की, लेखकाला अनेकदा लिहीत असलेल्या कादंबरीचा विषय काय असं विचारलं जातं. पण लेखकाला ते सांगता येत नाही. कारण त्यालाही तो हात घालत असलेल्या विषयाचा सगळा अवाका समजलेला नसतो. किंबहुना सगळं समजलंय, अशा थाटात लेखक कधी राहूच शकत नाही. तर तो त्याला समजलेल्या गोष्टी सांगणारा असतो अशी अवधूतची धारणा आहे. त्यामुळे या प्रकरणात तो म्हणतो –
एक अगदी खरं उत्तर सांगतो, ते असं : ह्या कादंबरीचा विषय असा नाही ओ थोडक्यात सांगता येणार.
विषय असा धडपणं कळला असता, सांगता आला असता, तर त्या विषयात डिग्रीच नसती काय घेतली. उच्च-अत्युच्च डिग्री. किंवा विषय बोर्डावर लावून त्यावर व्याख्यान नसतं का हाणलं. पण तसं जमत नसल्यामुळंच की काय विषय सांगायला सुरुवात केल्यावरसुद्धा काही गोष्टीच डोक्यात आल्या त्या ह्या गोष्टी. यातूनच कादंबरीच्या विषयाचा काहीएक अंदाज येऊ शकतो.
इथे हे नमूद करायला हवं की, अवधूत हा मिनिमॅलिस्ट शैलीचा लेखक आहे. म्हणजे अवधूत खूप वर्णनं करून, भरपूर तपशील देत डोळ्यांसमोर प्रसंग उभं करत नाही. तर तो मोजके तपशील देत, लेखन बांधतो. त्या तपशिलांच्या आसपास असलेले अनेक तपशील तो सूचकपणे वाचकाला विचार करून ध्यानी येतील अशी रचना करतो.
उदा – त्या वाटेच्या बाजूनं रान माजलेलं आहे. बर्‍याच झाडीची गुंतागुंत आहे. आणि तिथंच उभेच्या उभे सागवान आहेत. सागवानाची झाडं म्हणजे पलीकडच्या माडांसारखी वाकडी नाहीत, पण सरळ उंच. कुरकुरीत पानाचा खच.
सागवानाची उंच झाडं आहेत, हे सांगताना पलीकडची वाकलेली माडांची झाडांचा तपशील आपोआपच डोळ्यांसमोर येतो. मग त्यातून कोकण किंवा समुद्रकिनार्‍याचा भाग आठवतो. आणि सागवानाच्या झाडांमुळे गडचिरोलीचा भाग. हे दोन्ही भूभाग समांतरपणे डोक्यात येत-जात राहतात. कुरकुरीत पानांचा खच असं सांगूनही अवधूत कमीत कमी शब्दांत नादनिर्मिती करतो.
असे तपशील देऊन अवधूत वाचकांवर एक प्रकारे अर्थांतरणाची आणि कल्पनाशक्तीला चालना देण्याची जबाबदारीच टाकत असतो. प्रत्येक लेखक हा रख्या धारणेचा आणि शैलीचा नसतो किंवा नसावाच. विविधता जास्त तितकी बळकटी जास्त या नियमाचा आधार घेऊन कोणत्याही भाषेत विविध शैली असलेले लेखक जितके जास्त तितकी सकसता असण्याची शक्यता जास्त, असं म्हणता येतं. त्यामुळे कोणती शैली ग्रेट किंवा श्रेष्ठ असले दावे करणं हा इथे हेतू नसून, अनेक शैलीचे लेखक मराठीत हवेत, हे वाचकांवर ठसवणं हे आहे. त्यामुळे अवधूतच्या या लेखनशैलीचं कोर्‍या मनाने स्वागत करायला हवं, असं इथे नोंदवतो.
अवधूतच्या लेखनशैलीत ब्लॅक ह्यूमरही आहे. त्यासाठी यातली नेनेंची गोष्ट उदाहरण म्हणून पाहता येईल. या गोष्टीच्या सुरुवातीला नेने निवेदकाला उच्चावरून सूचना करतात ती अशी –
हे पाहा, एक मोठं हॉटेल आहे.हॉटेल नाही म्हणत रे बावळटा ह्याला. बरं बरं मोठं रेस्टॉरंट आहे. रेस्टॉरंटचा उच्चरा रेस्तरां असा आहे रे भाड्या...
नंतर नेने त्या रेस्तरांमध्ये बसून खतात असतात तेव्हा –
आता गेलेल्या नेने यांनी आपल्याला उच्चाराबद्दल जी सूचना केली, अगदी तशीच सूचना त्यांनी आत गेल्यावर त्यांच्या बायकोला केली. आपल्याच बायकोला ते भाड्या अशी शिवा घालत नाहीत, त्यामुळं शिवी सोडून त्यांनी आपल्या बायकोला सांगितलं की, इट्स नॉट पॅरिस, इट्स पारी पारी. नेने यांचा मुलगा वर्षभरापूर्वी ऑस्ट्रियाला गेला होता, तेव्हापासून नेने उच्चारांबाबत जागरूक झालेले आहेत. त्याचं पण खरंतर एक कारण आहे. नेने हे बाहेर बोलत नसले, तरी आपल्याला इथे ते नोंदवणं भाग आहे. मुलाला ऑस्ट्रियाची ऑफर आली, तेव्हा त्यानं घरी त्याबद्दल सांगितलं. तेव्हा नेने यांनी उत्साहानं फोन करून नातेवाइकांना सांगितलं की, वरद ऑस्ट्रेलियाला जातोय बरं का. इतकं इतकं पॅकेज आहे. तीन वर्षांसाठी.एवढं झाल्यावर त्यांच्या मुलानंच त्यांना सांगितलं की, ऑस्ट्रियाला चाललाय तो, ऑस्ट्रेलियाला नाही. यावर चपापलेले नेने नुसतंच ओह असं चीत्कारते झाले आणि स्पेलिंगमुळे गफलत झाल्याचं त्यांनी फेकून दिलं.
3.
कादंबरीमध्ये अवधूत बारीक बारीक कथा, गोष्टी सांगत जातो. त्या एकमेकांशी इंटकलिंक्ड असतात. या गोष्टींमधून कादंबरीत नक्षलवादी चळवळीतली माणसं येतात, चळवळीचा इतिहासही येतो. पण तरी कादंबरीचा मुख्य फोकस हा या चळवळीत किंवा माणसांच्या अखंड प्रवाहात असलेल्या व्यक्तींवर कायम राहतो. या व्यक्ती कोणी मोठे प्रसिद्ध नेते नसतात, किंवा हिरोही नसतात. तर ती साधीसुधी, मेल्यानंतर कुणालाही सहजी आठवणार नाहीत, अशी अनामिक माणसं असतात. म्हणूनच की काय, अवधूत या माणसांच्या आठवणींचं प्रातिनिधिक स्वरूपाचं बांधकाम या कादंबरीत रचतो. सुरुवातीलाच निवेदकाला सागवानाचं एक पान खाली पडताना दिसतं आणि ते हळूहळू मरत जाणार असल्याचं त्याच्या लक्षात येतं. त्यावरून त्याला अशा कधी काळी झाडाला चिकटून असलेल्या आणि नंतर गळून पडणार्‍या, मूकपणे संपून जाणार्‍या पानांची – पर्यायाने माणसांची गोष्ट सांगावीशी वाटते. या कादंबरीतली सगळी पात्र ही प्रवाहात असलेल्या, पण हळूहळू संपून जाणार्‍या पानांसारखीच भासतात.
भास्कर हा नक्षलवादी चळवळीतला मधल्या फळीतला कार्यकर्ता असतो. तरुण असल्यापासून त्याचा या डाव्या विचारांच्या चळवळीकडे ओढा असतो. आणि नंतर मग तो पूर्णपणे स्वत:ला नक्षलवादी चळवळीत झोकून देतो. जंगलात जाऊन काम करतो, मोठ्या नेत्यांमध्येही त्याची ऊठबस असते. पण आता तो उतारवयाला लागलेला आहे. आता त्याचा प्रत्यक्ष चळवळीत सहभाग नसला, तरी तो काही आरोपांखाली जेलमध्ये जाऊन सजा भोगून सुटून आलेला आहे. आणि आता तो त्याच्या कविता-कथा शोधून प्रकाशित करण्याच्या विचारात आहे. भास्करच्या निमित्ताने साठ-सत्तरच्या दशकापासून वाढत गेलेली नक्षलवादी चळवळ, तिच्यातले चढउतार आपल्याला समजतात. पण तरी अवधूत त्या इतिहासात अडकून पडत नाही.
भास्करप्रमाणेच सायली हे पात्रही चळवळीत प्रत्यक्ष सहभाग असलेलं आहे. ती भास्करपेक्षा खूपच तरुण आहे. तिला पहिल्यांदा आंबेडकरवाद जवळचा वाटतो, पण नंतर मात्र ती नक्षलवादाकडे ओढली गेलेली आहे. ती शहरात वाढलेली असून जेव्हा ती जंगलात काम करण्यासाठी कॉम्रेड्ससोबत सहभागी होते, तेव्हा तिला काही गोष्टी कळतात. तिथल्या आदिवासी कॉम्रेड्ससोबत संपर्क आल्याने तिला वेगळ्याच जगात राहणार्‍या त्या लोकांशी संबंध येतो. जंगलात राहिल्यावर चळवळीबद्दलचा सगळा रोमँटिसिझम खाडकन उतरून जातो आणि त्यामुळे शहाणी-समंजस होते. तिला आपण तिथे काम करून राहू शकत नाही हे समजतं, आणि म्हणून आपण बाहेर राहूनच काम केलं पाहिजे असं तिला वाटतं. या चळवळीमुळेच ती माणसांकडे समंजसपणे पाहण्याचं शिकते, पहिल्यांदा तिच्यात असलेला राग शांत होतो आणि ती माणसांना जसं आहे तसं स्वीकारायचं असं ठरवते, निदान तसा प्रयत्न तरी करायचा असं ठरवते.
सायलीचं अजय नावाच्या नक्षलवादी कार्यकर्त्यावर प्रेम आहे. ते दोघं लग्न न करता राहतही असतात, पण अजयला कोणत्यातरी कारणाने अटक होते. तो जेलमध्ये जातो. पण त्याची बातमी एवढी मोठी न झाल्याने व पुरावेही सबळ नसल्याने त्याची लवकरच सुटका होईल अशी आशा अजय आणि सायलीला वाटत असते. अजय तिला अधीर होऊन पत्र पाठवत असतो आणि तीदेखील त्याची बाहेर येण्याची वाट पाहत असते. सायलीचा दूरचा असलेला नातेवाईक श्रीधरही आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. पण त्याचा सहभाग प्रत्यक्षात नसल्याने त्याला कुठेतरी गिल्ट वाटत असते. म्हणून तो अनियतकालिकं काढून, त्यात लेख लिहून काहीतरी करू पाहत असतो.
गडचिरोलीच्या भागात पोस्टिंग झालेल्या एका पोलिसाची राणी ही नवविवाहित बायको आहे. ती पोलिसांच्या क्वाटर्समध्ये राहते आणि तिथे फारसं काहीच काम नसल्याने कंटाळलेली आहे. शिवाय सुरक्षेचा प्रश्न असल्याने तिला फारसं बाहेर फिरताही येत नाही. पण तिला तिथला निसर्ग मात्र आवडलेला आहे. तिचं नवर्‍यावर प्रेम आहे. लग्न झाल्यानंतर तिला काही महिन्यांत दिवस गेले होते, पण एकदा चेकिंगसाठी जात असताना रस्ता खराब असल्याने राणीचा गर्भपात होतो. पण लवकरच बदली होणार असल्याचं तिचा नवरा तिला सांगत असतो. त्यामुळे आता बदली झाल्यानंतरच चान्स घेऊ असं तो दोघं ठरवतात. ते दोघंही बदली होण्याची वाट पाहत असतात.
याशिवाय टिपणं काढणारा, कादंबरी लिहिण्याची इच्छा असलेला आणि निवेदकाचा मित्र यात आहे. त्याच्या टिपणात साम्यवाद, कार्ल मार्क्सचे विचार, मिलान कुंदेराची उद्धृतं, कवितावजा ओळी, सुटे सुटे विचार असं बरंच काही आहे. त्यातल्या काही निवडक नोंदी कादंबरीत आहेत. तसंच आनंद मानवी नावाचा एक प्रसिद्धपरांगमुख लेखकही आहे.
एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला हवा की, अवधूतला नक्षलवादी नेते, त्यांचा जीवनपट, संघर्ष आणि त्यातून येणारा इतिहास आदी गोष्टी सहज लिहिता आल्या असत्या. तशी माहितीही त्याला मिळवता आली असती. पण त्याने ते मुळातूनच टाळलं आहे. कारण त्याला चळवळीतल्या माणसांमध्ये, त्यांचं काय झालं, हे शोधण्यामध्ये जास्त रस आहे. त्याला चळवळीच्या इझम किंवा तत्त्वांपेक्षा त्यातल्या व्यक्तींवर, त्यातही खासकरून अनामिक राहणार्‍या व्यक्तींवर प्रकाशझोत टाकायचा आहे. मातीत रुजलेलं झाड जर उखडून काढलं, तर मुळांना माती चिकटून राहते. मुळं हा अवधूतचा फोकसपॉइंट आहे, तर माती ही चळवळ आहे. ती मुळांसोबत आपोआपच आली आहे. व्यक्ती आणि समाज यांचा संबंध किंवा ताण-तणाव यात अवधूत मांडू इच्छितो.
3.5
एक मध्येच जाणवलेला मुद्दा सांगून टाकतो, अन्यथा नंतर तो मध्ये कुठे सांगता येणार नाही. तो असा की, कादंबरीतल्या मजकुराच्या दर्जाच्या तुलनेचा विचार करता, तिची मांडणी व निर्मिती आणखी चांगली करता आली असती असं वाटलं. एक उत्पादन म्हणून पुस्तकाकडे पाहता, त्याचं मुखपृष्ठ, ब्लर्ब, मलपृष्ठाची मांडणी, टाइपची निवड, आतल्या मजकुराची मांडणी आदी गोष्टी कादंबरीला पूरक व वाचकाला आकर्षित करणार्‍या अशा मात्र जरूर करता आल्या असता असं मात्र सारखं वाटत राहिलं.
4.
अवधूतने कादंबरी या फॉर्मची सजगपणे मोडतोड केली आहे, हे मुद्दाम उल्लेख करायला हवा. कादंबरीत फोटो आहेत, टिपणं आहे, मुलाखती आहेत. फेसबुकवर टाकलेली स्टेटसं किंवा पोस्ट्स आहेत. जातककथा-कविता आहेत, नक्षलवादी चळवळीचा इतिहास आहे. सिनेमांच्या कथा आहेत. पत्रकारितातले फॉर्म आणि कादंबरीचा फॉर्म यांचा संकर केला आहे. तसंच काळ मागेपुढे करण्याचं तंत्रही वापरलं आहे. तसंच भाषिक गमतीजमती, कोट्याही केलेल्या आहेत. अद्भुतपणही आहे.
उदाहरण म्हणून गोधडी या प्रकरणातलं हे पात्राने फेसबुकवर टाकलेलं एक टाचण असं :
समोरचा माणूस कमकुवत दिसला की माणूस त्याच्यावर वर्चस्व गाजवण्याच्या भूमिकेत का जातो?
समोरचा माणूस कमकुवत दिसला की माणूस त्याच्याबद्दलच्या कणवेच्या भूमिकेत का जातो?
समोरचा माणूस कमकुवत दिसला की माणूस आधी कणवेच्या आणि नंतर वर्चस्वाच्या भूमिकेत का जातो?
समोरचा माणूस कमकुवत दिसला की माणूस आहे तसाच का राहत नाही?
कादंबरीत येणारे तीन मृत्यू महत्त्वाचे आणि प्रतीकात्मक वाटतात. पहिला म्हणजे पानाचा होत असलेला मृत्यू, दुसरा म्हणजे रस्ते चांगले नसल्याने पोटातच असलेल्या राणीच्या बाळाचा मृत्यू, आणि तिसरा म्हणजे एका चार महिन्याच्या बाळाची बगळ्यानी सांगितलेली गोष्ट. गावात बॉम्बस्फोट होतो आणि त्यानंतर चार महिन्यांच्या आपल्या बाळाला घेऊन त्याची आई धावू लागते. तेव्हा ती अडखळून पडते आणि दगडावर डोकं आपटून त्या मुलाचा मृत्यू होतो. त्याची ही गोष्ट मुळातून वाचण्यासारखी असली तरी त्यातला काही भाग असा –
जीव घेऊन धावत निघाली तेव्हा वाटेत काय आलं. दगड. हां. दगडच होता. पण बाई एरवी पडली नसती इतकासाच होता रे. त्या दगडाला पाय अडकून ती एकदम पडली तोंडावर. आणि पुढच्या आंब्याच्या झाडाच्या बुंध्याला तिचं डोकं आपटलं. उजव्या खांद्यावर असलेलं पोरगं त्या बुंध्याजवळच्या मोठ्या दगडावर खाडकन आपटलं. आणि. (थांब यार. नको.) तो आवाज मला एेकू आला नाही. कोणालाच एेकू आला नसणार. एवढ्याशा कवटीचा दगडावर पडल्यावर कितीसा आवाज येईल. आणि रस्त्यावरून येणार्‍या आवाजांमधे हा आवाज विरघळून गेला.
हे तीनही मृत्यूमधून आणि त्याच्या आगेमागे असलेल्या कथा-कहाण्यांमधून काय सांगायचं असेल, अवधूतला?  तर एक अर्थांतरण असं की, जग म्हणजे माणसांचा लसलसता प्रवाह असतो. जगाच्या रहाटगाडग्यात त्यात प्रवाहात असे अनेक जण येत-जात असतात, त्यातून चळवळी, पक्ष, विचारसरण्या उभ्या राहत असतात. यातल्या माणसांची काहीवेळा नोंद होते आणि काहींची तर अजिबातच होत नाही. ज्यांची होते त्यांचीही नंतर पुसट होत जाते. या कादंबरीची पानं या माणसांच्या कथांची आणि त्यांच्या नोंदींची आहे. त्यात ही काळाच्या पोटात गुडूप होणार्‍या माणसांची गोष्ट आहे.
अवधूतने एक गोधडी विणली आहे. त्यात फॉर्म आणि आशय आहे. (यात एक प्रकरणही गोधडी या नावाने आहे.) तो माणसांच्या गोष्टींची, लेखकाच्या सर्जनशील प्रक्रियेची ठिगळं जोडून ही गोधडी तयार करतो, आणि या ठिगळांना जोडण्यासाठी, धरून ठेवण्यासाठी कादंबरीचा धागा आणि कापड वापरतो. त्यामुळे अवधूतने विणलेली ही गोधडी नीट सजगपणे निरखून, पाहायला हवी, त्यातून वेगवेगळी अर्थांतरणं काढून पाहायला हवीत, असं वाटतं.
--
पान, पाणी नि प्रवाह

लेखक – अवधूत डोंगरे

पृष्ठसंख्या – 207, किंमत – 200

प्रकाशक – प्रफुल्लता प्रकाशन

- -    प्रणव सखदेव
sakhadeopranav@gmail.com
---
प्रतिमा सौजन्य - बुकगंगाडॉटकॉम
पुस्तक खरेदी करण्यासाठी - 
http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b30374&language=marathi

http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5508034122793455032

No comments:

Post a Comment