Monday, April 3, 2017

टर्न

टर्न
--
आणि एके दिवशी
हा रस्ता सोडून
मारावाच लागेल
एक मोठ्ठा टर्न
जो आधीच कधीतरी
पाहिलेला स्वप्नात
आणि मग हायवे

तेव्हा
हाय वे आणि हा रस्ता
यांना जोडणार्‍या मार्गात
कदाचित गाडीही बदलावी लागलेली
स्पीडही सेट करावा लागलेला वेगळा
टायर्स तपासावी लागलेली
आणि
चश्माही बदलावा लागलेला

आणि या दोघांना जोडणार्‍या
मधल्या मार्गात
दोन मिनिटं थांबावंही लागलेलं
घ्यावा लागलेला एक श्वास खोल
डोळे मिटून
तेव्हा पडलेलं स्वप्न-
ज्यासाठी चालून गेलेलं चश्म्याचं नसलेपण

आधीचा रस्ता
अपुरा वाटल्यानं सोडावा लागलेला
आणि पुढल्या हायवेवर काय असेल
याचं अज्ञात भय
दरडींसारखं तयार असलेलं

ही दोन मिनिटं अंधारी
इथे, मधेच थांबून राहावं आता
असा भास निर्माण करणारी
ही दोन मिनिटं म्हणजेच
स्वप्नातल्या स्वप्नाच्या सुरुवातीचा
एक टर्न
--
- प्रणव सखदेव

No comments:

Post a Comment